
हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही किती पाणी पिता? विशेष म्हणजे तुमची हायड्रेशन पातळी मोजण्याचा हा योग्य मार्ग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर आयुर्वेदामध्ये यावर वेगळा विचार सांगितला आहे. खरं तर तुम्ही 3-4 लिटर पाणी पिण्याचे ठरवलेले आहे म्हणून त्यासाठी फक्त पाणी पिणे हे अयोग्य आहे.
आयुर्वेदात पाणी पिण्याबद्दल काय सांगितले आहे हे जाणून घेण्यासाठी हॅपीएस्ट हेल्थने तज्ञांशी संवाद साधला.
‘तुमच्या शरीराला ठरवू द्या’
कर्नाटकातील मूडबिद्री येथील अल्वाच्या आयुर्वेद मेडिकल कॉलेज, प्रोफेसर डॉ घनश्याम बी. शर्मा हे या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकतात की, दिवसभरात किती पाणी प्यावे हे आयुर्वेदाने कधीच सांगितलेले नाही. त्याचबरोबर शरीराला किती पाण्याची आवश्यकता आहे हे शरीराला ठरवू द्यावे असे ही त्यांनी सांगितले.
पुढे डॉ बी. शर्मा सांगतात की “तहान लागली तरी तुमचे शरीर तुम्हाला इशारा देते. तुम्हाला फक्त तुमच्या शरीराची गरज जाणून घेण्याची आणि ती समजण्याची गरज आहे.”
प्रत्येकासाठीच वेगवेगळा दृष्टिकोन
प्रत्येकाला ठराविक प्रमाणात पाण्याची गरज नसते. वय, ऋतू, जीवनशैली (बैठक किंवा सक्रिय) किंवा अंतर्निहित वैद्यकीय परिस्थितीनुसार आवश्यकता असल्यास ती बदलते. ज्या व्यक्तीचा पचनशक्तीचा वेग चांगला आहे ( पित्त शरीर प्रकार) त्याला पाणी पिण्याची जास्त आवश्यकता असते, तर मंद किंवा संथ पचन असलेल्या व्यक्तीला (कफ शरीर प्रकार) पाण्याची आवश्यकता कमी असते.
त्याचप्रमाणे उन्हाळ्यात एखाद्याला पाण्याची जास्त गरज भासू शकते तर हिवाळ्यात ही गरज कमी असते.
जेवणाच्या दरम्यान पाणी पिणे योग्य की अयोग्य
जेवणादरम्यान पाणी पिणे या विषयाबाबत वेगवेगळी मते असली तरी, गुजरातमधील आयुर्वेदिक अभ्यासक डॉ. हेमंत शर्मा म्हणतात की, जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने अन्नाचे सहज विघटन होण्यास आणि पचन होण्यास मदत होते.
एखादी व्यक्ती जेवणानंतर पाणी पित असेल तर हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. डॉ शर्मा म्हणतात, आयुर्वेदात सांगितले आहे की, अन्नाच्या सेवनानंतर लगेचच पचनाचा पहिला टप्पा सुरू होतो. या टप्प्यावर पाणी प्यायल्याने पोषक तत्वांचे योग्य प्रकारे शोषण होऊ शकत नाही ज्यामुळे वजन वाढून लठ्ठपणा येतो”.
ते पुढे सांगतात की, “जेवणापूर्वी पाणी पिणे योग्य नाही कारण त्यामुळे भूक कमी होते आणि यामुळे अशक्तपणा येतो.”
कोरियाच्या जेओन्जू विद्यापीठातील संशोधकांनी जेवणापूर्वीच्या पाणी पिण्याच्या परिणामांचे मूल्यांकन केले आहे.
यामध्ये त्यांना असे आढळून आले की, जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने जेवणापासून मिळणारी ऊर्जा कमी होते. यावर ते सुचवतात की, जेवणाआधी पाणी पिणे हे वजन नियंत्रित करण्यासाठीचा एक प्रभावी उपाय असू शकतो.
जेवणाच्या चार भागांपैकी एका भागामध्ये पाणी/द्रव पदार्थ आणि अर्ध्या भागात योग्य घन/अर्ध-घन पदार्थ असावेत तर उरलेला भाग हवेसाठी अर्थात मोकळा असावा असे आयुर्वेदात सांगितले आहे.
कोमट विरुद्ध थंड पाणी
डॉ. बी. शर्मा हे स्पष्ट करतात की, आयुर्वेदामध्ये थंडगार / बर्फयुक्त पाणी पिणे निषिद्ध मानले आहे कारण त्याचा पचनावर नकारात्मक परिणाम होतो.पण अति तहान लागणे, थकवा, उलट्या, मद्यपान, जळजळ आणि उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याचा सल्ला दिला जातो.
अपचन, बद्धकोष्ठता, कफ यामुळे (पाणी आणि पृथ्वीच्या घटकांमध्ये असंतुलन) आणि हिवाळ्यात आरोग्याच्या कुरबुरी असलेल्या व्यक्तींसाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे पचनाच्या दृष्टीने हलके मानले जाते.
योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे फायदे
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनमध्ये (CDC) दिवसभरातील पाण्याचे एकूण सेवन हे खाद्यपदार्थ, पाणी आणि इतर शीतपेयांमध्ये असलेल्या पाण्याचे प्रमाण आहे असे सांगितले आहे. तुमच्या शरीराची हायड्रेशनची पातळी ही केवळ तुम्ही किती पाणी प्यायले आहे यावर अवलंबून नाही तर पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळे आणि भाज्यांच्या सेवनावरही अवलंबून आहे. शरीरातील हायड्रेशनची पातळी राखण्यासाठी पाणी पिणे हा एक सोपा मार्ग आहे कारण त्यात शून्य कॅलरीज असतात.
हायड्रेशन पातळी नीट असल्यास शारीरिक कार्यक्षमता वाढते. पाणी पिण्याचा परिणाम एखाद्याच्या स्मरणशक्ती आणि आकलनशक्तीवर देखील होऊ शकतो. याउलट पाणी कमी प्यायल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मूड आणि वागण्यात बदल होऊ शकतो. शरीरातील रक्ताचे गाळण किडणीद्वारे होते आणि रक्तामधून टाकाऊ पदार्थ गाळण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आणि लघवीद्वारे उत्सर्जन होते. पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने टाकाऊ आणि विषारी पदार्थांचे योग्य उत्सर्जन होण्यास मदत होते.
रक्ताचे प्रमाण, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके यांचा देखील पाणी पिणे आणि पाण्याच्या उत्पादनाशी जवळचा संबंध आहे.
फ्रान्समधील संशोधकांना असे आढळून आले की, जे लोक कमी मद्यपान करतात त्यांच्यामध्ये पाण्याचे सेवन वाढते आणि मूड चांगला राहून त्यांना कमी थकवा येतो, तसेच विचारांमध्ये स्थिरता येऊन झोपेची गुणवत्ताही सुधारते. सतत जास्त मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी अचानक सेवन कमी केल्याने त्याचा त्यांच्या मूडवर नकारात्मक परिणाम होतो. ते नेहमी अशांत असतात आणि त्यांच्यामध्ये साकारात्मक भावनांची कमतरता असते. अभ्यासाअंती असे स्पष्ट झाले आहे की, दिवसभरात जास्तीतजास्त २. ५ लिटर आणि कमीतकमी १ लिटर पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.
पाणी पिण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिलेल्या काही टिप्स
- दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा: सूर्योदयापूर्वी प्रातःविधींनंतर सर्वात पहिल्यांदा पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. साधारण रिकाम्या पोटी ६४० मिली पाणी प्यावे. त्यामुळे विषारी पदार्थ शरीराबाहेर काढण्यास मदत होते.
- तहान लागल्यावर पाणी प्या: आयुर्वेदामध्ये तहान ही उत्कट इच्छा मनाली गेली आहे. जर तुम्हाला तहान लागलेली आहे तर लगेचच पाणी प्या.
- एकावेळी भरपूर पाणी पिऊ नका: एकावेळी भरपूर पाणी प्यायल्यामुळे भूक न लागणे किंवा अपचनाचा धोका संभवतो.
- थंड/अति थंड पाणी पिणे टाळा: आयुर्वेदामध्ये थंड पाणी पिणे निषिद्ध मानले आहे. यामुळे जठराग्नी मंदावतो असे सांगितले जाते.
- ऋतुमानानुसार पाणी प्या: उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते तर हिवाळ्यात ही गरज कमी असते म्हणून ऋतूंच्या आधारे पाणी प्यावे.