
कलिंगडाच्या रसामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे डायाबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी याचे कमी प्रमाणात सेवन करावे, परंतू असे असले तरीही या फळाच्या बियांमध्ये डायाबिटीस नियंत्रणात ठेवण्याची क्षमता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कलिंगडाच्या बिया या दुर्लक्षित राहिलेल्या असल्या तरीही त्यांच्यामध्ये विविध पोषकतत्वे आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्याची क्षमता आहे.
गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलचे सल्लागार हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सब्यसाची मुखोपाध्याय यांच्या मते, “सहसा अनेक फळांच्या बियांमध्ये पोषकतत्वे असतात कारण त्यांच्यामध्ये बीजांकुरण होते आणि नंतर त्याचे झाड होते.”
तज्ज्ञांच्या मते, कलिंगडाच्या बियांमध्ये लोह, फायबर, प्रोटीन आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. दाहक विरोधी गुणधर्म असलेल्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असण्याव्यतिरिक्त या बियांमध्ये बी, सी आणि ई जीवनसत्त्वे देखील असतात.
“या बियांमध्ये ओमेगा -3 आणि ओमेगा -6 हे चांगले फॅटी ऍसिड असतात. ही पोषकतत्वे हृदयरोग, हायपरटेन्शन, डायबिटीस, ऑटोइम्यून रोग आणि अगदी मूत्रपिंडातील गुंतागुंतीची परिस्थिती असलेल्या व्यक्तींसाठीही फायदेशीर आहेत,” असे डॉ. मुखोपाध्याय म्हणतात. या बियांमध्ये कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगल्या स्नॅक्सचा पर्याय देखील ठरू शकतात.
कलिंगडाच्या बियांचे सर्वोत्तम फायदे – Benefits of Watermelon Seeds
डॉ. मुखोपाध्याय हे स्पष्ट करतात की, सकस आहाराचा भाग म्हणून कलिंगडाच्या बिया खाल्ल्यास हाय ब्लडप्रेशर तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यांमध्ये MUFA (मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड) आणि PUFA (पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड) असतात जे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करतात. याव्यतिरिक्त, या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम हे ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते.
आहारतज्ञ आणि 360 डिग्री न्यूट्रीकेअर (एक ई-क्लिनिक) च्या संस्थापक दीपलेख बॅनर्जी म्हणतात की, या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हे व्हॅसोडिलेटर म्हणून काम करतात (जे रक्तवाहिन्यांचा विस्तार करतात) ज्या हाय ब्लडप्रेशर कमी करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, कलिंगडाच्या बियांमधील लोहामुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता सुधारते, तर झिंकमुळे हृदयातील कॅल्शियम संबंधातील हालचाली नियंत्रित करण्यास मदत होते.
हैदराबाद येथील कामिनेनी हॉस्पिटलमधील वरिष्ठ एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ संदीप रेड्डी सांगतात की, टाइप 2 डायबेटीस असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. कलिंगडाच्या बिया खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन तसेच कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याचे प्रकार टाळता येतात, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्याच्या संबंधातील गुंतागुंत वाढण्याचा धोका कमी होतो.
डायबेटीसचे व्यवस्थापन करण्यात कलिंगडाच्या बियांची भूमिका
कलिंगडाच्या बिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात त्यामुळे डायबेटीस असलेल्या लोकांसाठी हा स्नॅक्स म्हणून एक चांगला पर्याय आहे. या इंसुलिन प्रति शरीराची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतात (तुमच्या पेशी इन्सुलिनला किती प्रतिसाद देतात). डॉ. बॅनर्जी सांगतात की, मॅग्नेशियम हे कार्बोहायड्रेटचे पचन नियंत्रित करण्यास देखील मदत करते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. “मॅग्नेशियम हा इंसुलिन स्रवण्यासाठी आणि कार्बोहायड्रेटच्या पचनासाठी आवश्यक असलेला सूक्ष्म पोषक घटक आहे,” असे डॉ रेड्डी म्हणतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डायबेटीस असलेल्या व्यक्ती या कलिंगड आणि त्याच्या बिया हे दोन्ही खाऊ शकतात. डॉ. रेड्डी याविषयी सांगतात की, कलिंगडामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असताना ग्लायसेमिकचा भार (खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत अपेक्षित वाढीचा अंदाज) हा कमी असतो आणि त्यात पाण्याचे प्रमाणही जास्त असते. पण साखर घालून कलिंगडाचा रस पिणे हे कदापि चांगले नाही असे ते सांगतात.
तुमच्या आहारामध्ये कलिंगडाच्या बियांचा समावेश करणे
डॉ. बॅनर्जी यांच्या मते कलिंगडाच्या पांढऱ्या आणि काळ्या दोन्ही प्रकारच्या बिया खाणे सुरक्षित आहे. याशिवाय, डॉ. रेड्डी म्हणतात की, या बियांमध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात जे भात, पोळी किंवा भाजी यांसारख्या आपल्या नियमित पदार्थांमध्ये सामान्यत: नसतात. म्हणूनच हे आपल्या आहारातील एक चांगला पोषक घटक ठरू शकतात.
आपण कलिंगडाच्या बिया कच्च्या किंवा भाजून खाऊ शकतो. त्या फळांमधून काढून वळवता येतात. वाळल्यानंतर या बिया सॅलड्स आणि सँडविचमध्ये घालता येतात किंवा स्नॅक म्हणून खाता येतात.
बोध
- कलिंगडाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे हृदय व रक्तवाहिन्यांची स्थिती, हायपरटेन्शन, डायबेटीस, मूत्रपिंडच्या समस्या आणि लठ्ठपणा यांसारखे आजार असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर असतात.
- या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त यामध्ये असलेल्या लोहामुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता सुधारते, तर जस्त हे हृदयातील कॅल्शियम संबंधीच्या हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते.
- इन्सुलिनची प्रतिरोधक क्षमता सुधारण्याबरोबरच या बिया कार्बोहायड्रेटचे पचन देखील नियंत्रित करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.
- कलिंगडाच्या बिया स्नॅक म्हणून देखील खाता येतात. याव्यतिरिक्त त्या वाळवून सॅलड्स आणि सँडविचमध्ये घालता येतात.