
रक्तदान हे असे नि:स्वार्थी काम आहे ज्यामुळे जगभरात बऱ्याच जणांचे जीव वाचतात. पण टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी काही प्रतिबंधांमुळे रक्तदान करणं कठीण होऊ शकतं. तज्ञ असं म्हणतात की, साखरेच्या पातळीच्या काटेकोर नियंत्रणासोबत योग्य तयारी आणि रक्तदानानंतरची योग्य काळजी यांमुळे रक्तदात्याला आणि रक्त घेणाऱ्या दोघांनाही सुरक्षितपणे रक्तदान करता येते. ते आणखी सांगतात की, असं केल्यामुळे डायबिटीज असलेल्यांच रक्त जरी घेतलं तरी रक्त घेणाऱ्याला डायबिटीज होणार नाही.
या व्यतिरिक्त, अलीकडील संशोधन अभ्यास दाखवतात की, रक्तदान केल्यानंतर रक्तातील लोहाची मात्रा कमी होते व इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते ज्यामुळे इन्सुलिनची निर्मिती आणि ग्लुकोजचा टॉलरन्स तात्पुरता वाढते.
डायबिटीज असलेल्या व्यक्ती रक्तदान करू शकतात का
बँगलोरमधील एस्टर सी. एम. आय. हॉस्पिटलमधील हीमॅटोलॉजी, हीमॅटो-ऑन्कोलॉजी, पेडियाट्रिक हीमॅटो-ऑन्कोलॉजी आणि बोन मरो ट्रान्स्प्लांटचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. अनूप म्हणतात की, “बऱ्याच रक्तपेढी डायबिटीज असलेल्यांना किंवा त्यासाठी औषधं घेत असलेल्या रक्तदात्यांना अपात्र ठरवतात आणि असं करण्यासाठी कोणतंही वैज्ञानिक कारण नाहीए. रक्तातील साखरेची पातळी चांगली नियंत्रित केलेल्या व्यक्तीचं रक्त घेतल्यानं रक्त घेणाऱ्यावर त्याचे प्रतिकूल परिणाम होण्याचं प्रमाण खूप कमी असते. असं फक्त मानलं जातं की डायबिटीज नियंत्रित करणारी औषधं घेणाऱ्या व्यक्तीचं रक्त जर घेतलं तर रक्त घेणाऱ्या व्यक्तीला देखील डायबिटीज होतो.” ते पुढे म्हणतात की जर रक्तपेढी रक्तदान स्वीकारत नसेल तरच चांगल्याप्रकारे नियंत्रित असलेला टाइप 2 डायबिटीज आणि उच्च रक्तदाब असलेल्यांनी रक्तदान करणं टाळावं.
रक्तदाता आणि रक्त घेणारा दोघांच्याही आरोग्याचा विचार करून रक्तपेढ्या अनियंत्रित डायबिटीज असलेल्यांच रक्त घेण्याच टाळतात. कोचीमधील के.एम.के हॉस्पिटलमधील, इंटर्नल मेडिसिन, एंडोक्राइनोलॉजी आणि डायबिटीज विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि सल्लागार, डॉ. विनायक हिरेमठ असं म्हणतात की, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीतील चढ-उतारामुळेही टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीज असलेल्या व्यक्तींना रक्तदान करणं अवघड होतं. “याशिवाय, डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी औषधं आणि त्यांचे परिणाम यांमुळेही असा व्यक्ती किती रक्तदान करू शकेल किंवा करू शकणार नाही हे सांगता येत नाही. म्हणून, त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना रक्तदान करण्यापासून मना केलं जातं,” ते स्पष्ट करतात.
टाइप 1 डायबिटीज आणि रक्तदान
सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये किंवा तरुण प्रौढांमध्ये टाइप 1 डायबिटीजचे निदान होते, ज्यांना दररोज इन्सुलिन देण्याची गरज भासते. डॉ. हिरेमठ म्हणतात की, “रक्तातील साखरेची पातळीमधील चढ-उतार आणि इतर संबंधित आजारांचे (जसं की रेटिनोपॅथी, न्यूरोपॅथी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित आजार आणि संसर्गाची संवेदनशीलता) निदान झालेल्या लोकांना रक्तदान करताना अधिक अडथळे येतात.”
याशिवाय, डॉ अनूप सांगतात की अशा लोकांच्या रक्तामध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढलेलं असू शकतं ज्यामुळे रक्त घेणाऱ्याच्या रक्तातील शुगरची लेव्हल सैद्धांतिकदृष्ट्या कमी होऊ शकतं. “पुन्हा, यासाठी कोणतेही भक्कम वैज्ञानिक पुरावे नाहीएत. पण, ते म्हणतात की, सुरक्षिततेचा उपाय म्हणून कदाचित रक्तपेढ्या टाइप 1 डायबिटीज असलेल्यांचं रक्तदान स्वीकारणार नाहीत.”
टाइप 2 डायबिटीज आणि रक्तदान
डॉ. हिरेमठ असं म्हणतात की, आजाराची तीव्रता आणि उपचार पद्धती यावर टाइप 2 डायबिटीज असलेल्या व्यक्ती रक्तदान करू शकतात किंवा नाही हे ठरतं. डॉ अनूप म्हणतात की, “अनियंत्रित डायबिटीज सोबत इतर संबंधित आजार असल्यास, 350 ते 400 मिली रक्त काढून टाकल्यानं कधीकधी रक्तदात्याला अस्वस्थ वाटू शकतं किंवा चक्कर येऊ शकते.”
ते पुढे सांगतात की, रक्तपेढ्यांच्या गरजा देखील मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतात. ते म्हणतात की, “एखाद्या भागात विशिष्ट रक्तगटाची कमतरता असल्यास, ते डायबिटीज असलेल्या व्यक्तीकडून रक्त स्वीकारू शकतात, तसेच पुरेसा साठा असल्यास, ते नाकारूही शकतात.”
कोणती मार्गदर्शक तत्त्वं आहेत?
रक्तदाता आणि रक्त घेणारा दोघांचेही हित लक्षात घेऊन राष्ट्रीय कायदे आणि संस्था यांनी रक्तदानासाठी काही पात्रता निकष ठरवले आहेत. विभिन्न देशांद्वारे पालन केली जाणारी काही आवश्यक मार्गदर्शक तत्त्वं ही आहेत:
♦ राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, भारत
- आहार किंवा तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या औषधांनी डायबिटीज नियंत्रित असेल तर डायबिटीज असलेल्या व्यक्ती रक्तदान करू शकतात.
- इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत.
♦ अमेरिकन रेड क्रॉस सोसायटी
- डायबिटीजसारखे जुने आजार असलेले व्यक्ती जर उपचार घेत असतील आणि तो नियंत्रणात असेल तर रक्तदान करू शकतात.
♦ NHS ब्लड अँड ट्रान्स्प्लांट, यूके
- फक्त आहाराद्वारे डायबिटीज नियंत्रित केला गेला असेल किंवा चार आठवडे किंवा त्याहून अधिक काळ एकच औषध त्याच डोसमध्ये घेत असलेले व्यक्ती डायबिटीज असतानाही रक्तदान करू शकतात.
- ज्यांना नेहमी इन्सुलिनची गरज असते किंवा ज्यांनी गेल्या चार आठवड्यांत इन्सुलिन घेतले असेल ते रक्तदान करू शकत नाहीत.
- हार्ट फेल झालेले आणि इतर संबंधित आजार असणारे व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत.
लक्षात ठेवायच्या गोष्टी
- बऱ्याच रक्तपेढ्या डायबिटीज असलेल्या व्यक्तींचं रक्त स्वीकारत नसल्यामुळे त्यांना रक्तदान करणं कठीण वाटू शकतं. तज्ञ असं म्हणतात की, जर डायबिटीज असलेल्या व्यक्तींची साखरेची पातळी चांगली नियंत्रणात असेल तर योग्य ती काळजी घेऊन ते रक्तदान करू शकतात.
- डायबिटीज आणि त्याच्या संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे एक व्यक्ती किती रक्तदान करू शकते किंवा करू शकत नाही हे ठरते.
- रक्तपेढ्यांच्या गरजा देखील मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतात. एखाद्या भागात विशिष्ट एखाद्या रक्तगटाची कमतरता असल्यास, ते डायबिटीज असलेल्या व्यक्तीकडून रक्त स्वीकारू शकतात.
- डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी हायपोग्लाइसेमियासारख्या स्थिती टाळण्यासाठी रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर रक्तातील ग्लुकोजची लेव्हल तपासून घेतली पाहिजे. याशिवाय, इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी काही इन्फेक्शन तर नाही ना याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पुरेशी विश्रांती देखील घेतली पाहिजे.