
दोन वर्षांपूर्वी मेघालयातील ३२ वर्षीय मारिया शीला यांना अचानक खूप चक्कर येणे आणि मळमळणे या कारणांनी हॉस्पिटलच्या आपत्कालीन युनिटमध्ये दाखल केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ही लक्षणे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधी दोन दिवसांपासून सुरु झालेली होती आणि ती वाढत गेली.
शीला यांना आठवते की, या काळामध्ये त्यांना त्यांच्या डाव्या कानाने ऐकू येत नव्हते. डॉक्टरांनी त्यांना लेबिरिन्थायटिस(Labyrinthitis) असल्याचे निदान केले.
कोलकता येथील आनंदपूरमधील फोर्टिस हॉस्पिटलच्या कान नाक आणि घसा तज्ञ किंवा ईएनटी स्पेशलिस्ट डॉ. सुचिर मैत्रा यांच्या मते लेबिरिन्थायटिस हा एक प्रकारचा शारीरिक विकार आहे ज्यामध्ये कानाच्या आतील बाजूस दाह होतो. यामध्ये चक्कर येणे, मळमळणे, व्हर्टिगो आणि कमी ऐकू येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. शीला यांच्यामध्ये अशाच प्रकारची लक्षणे दिसून येत होती.
कारणे
गुरुग्राम येथील सीके बिर्ला हॉस्पिटलचे मुख्य ईएनटी तज्ञ डॉ. अनिश गुप्ता यांच्या मते, लेबिरिन्थायटिसमध्ये होणारा दाह हा कानातील व्हायरल किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे होतो (लक्षणे ही सामान्यतः सारखीच असतात). “ क्वचितच बुरशीजन्य संसर्गामुळे हे होऊ शकते.”
- व्हायरल लॅबिरिन्थायटिस हा अनेकवेळा श्वसनाशी संबंधीत संक्रमण जसे की फ्लू किंवा सामान्य सर्दीमुळे होतो.
- कानातील संसर्गावर उपचार न केल्यामुळे बुरशीजन्य लॅबिरिन्थायटिस होतो.
“काही केसेसमध्ये डोक्याला मार लागल्यामुळे देखील लॅबिरिन्थायटिस होऊ शकतो आणि तो मेंदुज्वरासाठीचे कारण असू शकतो” असे डॉ. गुप्ता सांगतात.
लक्षणे
कोलकाता येथील डॉ. सुचीर मैत्रा यांच्या मते, याचे एक प्रमुख लक्षण म्हणजे व्हर्टिगो आहे जी गरगरणे किंवा चक्कर येण्याची संवेदना आहे. लॅबिरिन्थायटिस(Labyrinthitis) असणा-या व्यक्तींमध्ये व्हर्टिगोचे अचानक आणि गंभीर परिणाम दिसतात, तसेच त्यांना शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येते. यामुळे त्यांना अडखळणे किंवा पडणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. डॉ. मैत्रा यांच्या मते यामध्ये इतर काही सामान्य लक्षणांचा देखील समावेश होतो:
मळमळणे आणि उलट्या होणे: व्हर्टिगोमुळे मळमळ होते आणि काही जणांना उलट्या देखील होतात.
ऐकू येणे बंद होणे: लॅबिरिन्थायटिसमुळे एक किंवा दोन्ही कानांनी ऐकू येणे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बंद होऊ शकते. ऐकू न येण्याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.
टिनिटस: लॅबिरिन्थायटिस असलेल्या काही व्यक्तींना जो कान प्रभावित झालेला आहे त्यामध्ये गुणगुणणे किंवा इतर सामान्य नसलेले आवाज येऊ शकतात.
कान दुखणे: विशेषतः लॅबिरिन्थायटिस हा एखाद्या संसर्गामुळे झालेला असेल तर कान दुखणे किंवा कानाच्या आत दाब जाणवणे अशा गोष्टी घडू शकतात.
शीला सांगतात की, “मला सतत गरगरल्यासारखे होत होते खासकरून तेव्हा जेव्हा मी स्थित बदलत होते. त्याचबरोबर मळमळसुद्धा होत होती.” यापुढे शीला सांगतात की, “तज्ञांनी ऑडिओग्राम, सीटी स्कॅन, एमआरआय आणि इतर काही चाचण्या केल्या आणि लॅबिरिन्थायटिस असल्याचे निदान झाले.”
निदान
याची निदान पद्धती गुंतागुंतीची नाही; डॉ मैत्रा आणि डॉ गुप्ता यांच्या मते तज्ञ हे यापैकी काही चाचण्यांची वारंवार शिफारस करतात:
१. ऑडिओग्राम: ऐकू येण्याच्या या चाचणीमध्ये कमी ऐकू येण्याच्या प्रमाणाचे आणि प्रकारचे मूल्यांकन केले जाते.
२. इलेक्ट्रोनिस्टॅगमोग्राफी (ENG) किंवा व्हिडीओनिस्टाग्मोग्राफी (VNG) – यामध्ये डोळ्यांच्या हालचालींवरून आणि नोंद करून कानाच्या आतील भागाचा अभ्यास करतात.
३. इमेजिंग चाचण्या: काही केसेसमध्ये लक्षणांची इतर संभाव्य कारणे वगळण्यासाठी सीटी स्कॅन किंवा एमआरआय करण्यास सांगितले जाऊ शकते.
उपचार
डॉ. मैत्रा आणि डॉ. गुप्ता यांच्या मते आजाराची तीव्रता आणि वैयक्तिक परिस्थितीनुसार उपचाराच्या पर्यायांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
औषधे: डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतल्याने लक्षणांपासून आराम मिळू शकतो.
रिहॅबिलिटेशन(Labyrinthitis) थेरपी: शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी आणि गरगरणे कमी करण्यासाठी VRT किंवा वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपीची शिफारस केली जाऊ शकते.
“ एका तीव्र झटक्याचा कालावधी एक आठवड्यापर्यंत असू शकतो आणि IV फ्लुइड किंवा तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी सहजपणे व्यवस्थापित केला जाऊ शकतो. काही केसेसमध्ये ऐकू येऊ शकते” असे डॉ. गुप्ता म्हणतात.
शीला यांना पुरेशा विश्रांतीसह काही औषधे घेण्यास सांगितली होती. “मला तीन ते चार आठवड्यांत बरे वाटू लागले, परंतु लक्षणे पूर्णपणे निघून जाण्यासाठी काही [अधिक] काळ लागला.”
जोखमीचे घटक
डॉ. मैत्रा यांच्या मते, कोणतेही विशिष्ट जोखीम घटक नसले तरी अति मद्यपान, ऍलर्जीची पूर्वस्थिती, नुकताच झालेला विषाणूजन्य आजार, श्वसन संक्रमण किंवा कानामध्ये संसर्ग, वारंवार धूम्रपान करणे, वाढलेला ताण, किंवा विशिष्ट प्रिस्क्रिप्शन किंवा प्रिस्क्रिप्शन नसलेली औषधे (जसे की ऍस्पिरिन) घेणे लॅबिरिन्थायटिस होण्याची शक्यता वाढू शकते.
त्यांच्या मते, “ बहुतेकवेळा कानाच्या शस्त्रक्रियेनंतर असे घडते.”
कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये हा धोका असतो असे डॉ. गुप्ता म्हणतात. त्यामध्ये अनियंत्रित डायबेटीस आहे; कॅन्सरवर केमोथेरपी घेणारे; आणि ज्यांचे मूत्रपिंड किंवा यकृत प्रत्यारोपण झाले आहे अशा व्यक्तींचा समावेश होतो.
डॉ. गुप्ता याच्या करणादाखल सांगतात की, “कोणत्याही जोखीम घटकाशिवायही रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या लोकांमध्येही लॅबिरिन्थायटिस होऊ शकतो.”