
कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये जसे की, धावणे, चालणे, सायकल चालविणे किंवा दिवसभरातील कोणत्याही हालचाली असो यांमध्ये गुडघ्याचा वापर होतो. कोणत्याही प्रकारच्या गुडघे दुखीमुळे मग ती जास्त असो किंवा कमी असो यामुळे अशा क्रिया मंदावतात. योग्य पद्धतीने व्यायाम करूनही जर गुडघे दुखी झाली तर नक्कीच गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. तथापि या वेदना खऱ्या आणि सामान्य आहेत. धावताना किंवा कोणत्याही शारीरिक हालचाली करताना गुडघ्याच्या पुढच्या भागात (कोणत्याही लक्षणांशिवाय) वेदना होत असल्यास ती गुडघेदुखी किंवा पॅटेलोफेमोरल पेन सिंड्रोमची (PFPS) लक्षणे असू शकतात.
गुडघे दुखी(Knee pain) म्हणजे काय?
गुडघे दुखी म्हणजे गुडघ्याच्या सांध्यावर जास्त ताण आल्यामुळे गुडघ्याच्या वाटीच्या आसपास असलेल्या स्नायूंमध्ये वेदना होणे. ही स्थिती धावपटू, सायकलस्वार आणि खेळाडूंमध्ये सामान्य आहे. पण ज्या व्यक्तींची कामे बसूनच असतात त्यांच्यामध्ये सुद्धा ही स्थिती दिसून येते.
अॅनाल्स ऑफ ट्रान्सलेशनल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास लेखात गुडघ्याच्या वाटीच्या असंतुलित हालचालींमुळे (मांडीच्या हाडाच्या शेवटी एक खोबणी असते ज्याच्या आत गुडघाची वर आणि खाली हालचाल होत असते), ज्यामुळे गुडघ्यामध्ये वेदना होतात असे म्हटले गेले आहे.
धावपटूंमध्ये गुडघ्याच्या इतर सामान्य दुखापतींव्यतिरिक्त आयटी बँड सिंड्रोम आणि जंपर्स नी सुद्धा दिसून येतात. वास्तविक हे सायकलस्वारांना देखील होऊ शकतात.
गुडघे दुखीची कारणे
गुडघ्याच्या सांध्यांचा अतिवापर हे गुडघेदुखीच्या कारणांपैकी एक कारण आहे. या व्यतिरिक्त, हालचालींमधील कोणताही बदल किंवा त्यामध्ये आलेला व्यत्यय (शरीराच्या विविध भागांचे एकमेकांशी असलेले संबंध, सांधे आणि स्नायूंना जोडणे आणि हालचाली करण्यासाठी एकत्र काम करणे असे या संकल्पनेचे वर्णन केले जाते) तसेच स्नायू ताठरल्यामुळे देखील वेदना होऊ शकतात.
जोसेफ यांच्या मते, शरीराचे वजन हा गुडघे दुखीमधील एक महत्वाचा भाग आहे.“याच्या इतर कारणांमध्ये मुख्यतः कमकुवत स्नायू आणि पायाचे स्नायू यांमध्ये हॅमस्ट्रिंग, क्वाड्रिसेप्स, हिप जॉइंट्स आणि पोटरीचे स्नायू ताठरणे यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त ते सांगतात की, पायात कोणतेही संरचनात्मक बदल जसे की, फूट प्रोनेशन हे देखील गुडघ्यावर ताण आणू शकते”.
कोणतीही शारीरिक हालचाल नसलेल्या व्यक्तींना देखील गुडघे दुखीचा त्रास होऊ शकतो. खूप काळ बसणे किंवा गाडी चालवणे यामुळे गुडघ्यांवर ताण येतो ज्यामुळे गुडघे दुखी होऊ शकते.
गुडघे दुखीची लक्षणे
गुडघ्याचा समावेश असलेल्या शारीरिक हालचालींमध्ये वेदना जाणवणे हे गुडघे दुखीचे महत्वाचे लक्षण आहे. काही केसेसमध्ये गुडघ्याच्या हालचालींमध्ये हाडांचा आवाज सुद्धा येऊ शकतो.
कोची येथील मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स फिजिओ आणि हेड फिजिओथेरपिस्ट एमए जोसेफ म्हणतात, “धावणे किंवा इतर कोणत्याही शारीरिक हालचालींमध्ये गुडघ्याच्या हालचालीचा महत्वाचा भाग असतो ज्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता असते”. “गुडघे दुखीमध्ये वेदना होणे हे एकमेव लक्षण असते आणि सूज येत नाही. पायऱ्या चढणे, धावणे, उतारावर चालणे आणि बसणे यासारख्या कृतींमध्ये एखाद्या व्यक्तीला वेदना जाणवते.”
उपचार
गुडघेदुखीच्या उपचारांमध्ये फिजिओथेरपीची महत्वाची भूमिका असते तर वेदनाशामक औषधे दुय्यम भूमिकेमध्ये असतात.
उपचारांमध्ये याचा समावेश होतो:
- ताठरलेल्या स्नायूंना शिथिल करणे.
- पाय किंवा शरीराच्या पार्श्व भागातील कमकुवत स्नायूंना बळकट करणे.
- वेदना कमी करण्यासाठी गुडघ्याला थोड्या थोड्या अंतराने बर्फाने शेक देणे.
- कम्प्रेशन स्लीव्हज किंवा पट्टी वापरून गुडघ्याचा सांधा दाबणे. पण हे खूप घट्ट नसतील याची काळजी घ्या.
गुडघे दुखी कशी टाळता येईल?
योग्य वॉर्म-अप आणि कूल-डाऊन व्यायामांची दिनचर्या, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योग्य पद्धतीने धावणे या सर्व गोष्टी गुडघे दुखी थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
मुंबईमध्ये राहणारे धावपटूंचे प्रशिक्षक आणि अल्ट्रामॅरेथॉनर प्रीत परविंदर म्हणतात, “काही व्यक्ती योग्य पद्धतीने धावत नाहीत, त्या एकतर अयोग्य शारीरिक ठेवणीतून धावतात किंवा वॉर्म-अप आणि कूल-डाउन व्यायाम करत नाहीत.” याव्यतिरिक्त कमी वेळेत खूप गोष्टी करण्याच्या प्रयत्नांमध्ये गुडघ्यावर ताण येतो. त्यामुळे गुडघ्याच्या दुखापती टाळण्यासाठी सध्या आवश्यक गोष्टींवर लक्ष देणारे मार्गदर्शन आवश्यक असते. ते पुढे सांगतात की, जर कोणतीही व्यक्ती खूप काळानंतर व्यायाम करीत असेल तर तिने सुरुवातीपासून सुरुवात करून आणि हळूहळू वाढवत नेणे गरजेचे आहे. हे धावणे, सायकल चालवणे आणि कोणत्याही शारीरिक हालचालींना लागू होते.”
बोध
- गुडघ्याच्या सांध्याचा अतिवापर हे गुडघे दुखी किंवा पॅटेलोफेमोरल पेन सिंड्रोम (पीएफपीएस) चे मुख्य कारण आहे. इतर कारणांमध्ये पाय आणि नितंबांमधील घट्ट किंवा कमकुवत स्नायू यांचा समावेश होतो.
- संरचनात्मक बदल (जसे की फूट प्रोनेशन) किंवा हालचालींमध्ये येणाऱ्या व्यत्ययामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि परिणामी वेदना होतात.
- गुडघ्याची हालचाल करताना वेदना जाणवणे हे मुख्य लक्षण आहे. तथापि, या वेदनेमध्ये कोणत्याही प्रकारची सूज नसते.
- वॉर्म अप आणि कूल-डाऊन व्यायाम, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योग्य पद्धतीने धावणे यांमुळे गुडघेदुखी टाळता येते.