
डेंग्यू हा डासांपासून पसरणारा विषाणूजन्य रोग आहे, जो संक्रमित एडिस प्रजातीच्या मादी डासांच्या चावण्यामुळे होतो. एडीस या डासाचे चार प्रकार आहेत ज्यांच्यामुळे माणसांमध्ये संक्रमण होते, एडीस-एजिप्ती आणि अल्बोपिक्टस या सर्वात जास्त प्रचलित प्रजाती आहेत.
हे डास सहसा सावलीच्या ठिकाणी किंवा ढगाळ हवामानात सकाळी आणि संध्याकाळी चावतात, पण यांच्यामुळे वर्षभर केव्हाही संसर्ग होऊ शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव हा सामान्यतः उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये होतो आणि कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो.
पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आणि हे डास अनेकवेळा विहिरी, पाण्याच्या टाक्या, जुन्या कारचे टायर आणि कुलर किंवा लहान कंटेनरमध्ये साचलेल्या पाण्यात आढळतात. या साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास जास्त प्रमाणात होते.
लक्षणे
संसर्ग झाल्यापासून साधारणपणे तीन दिवस ते दोन आठवड्यांनंतर डेंग्यूची लक्षणे दिसून येतात. याला मानवी शरीरात डेंग्यू विषाणूचाप्रसार होण्याचा कालावधी म्हणतात. या लक्षणांमध्ये पुढील गोष्टी दिसून येतात:
- थंडी वाजणे, थरथर कापणे यांसह खूप ताप येणे
- विशेषतः डोळ्यांच्या मागील भागात प्रचंड डोकेदुखी
- स्नायू आणि सांधे दुखी
- अशक्तपणा आणि थकवा
- मळमळ आणि उलट्या
- संपूर्ण शरीरावर पुरळ उठणे
- भूक न लागणे
- घसा लाल होणे
- वाढलेले यकृत किंवा प्लीहा
कारणे
डेंग्यू हा आजार संसर्ग झालेल्या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकत नाही परंतु डास चावल्यामुळे एक व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरणे शक्य आहे. जर एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीला मादी डास चावला आणि हा डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावला तर संसर्ग पसरू शकतो आणि संसर्गाचे हे चक्र चालू राहते.
निदान
शारीरिक आणि लॅब टेस्टमधून डेंग्यूचे निदान केले जाते. यामध्ये समाविष्ट आहे:
- डेंग्यूची विशिष्ट चिन्ह आणि लक्षणं यांचे निदान करणारी शारीरिक तपासणी.
- NS1 किंवा NS2 या डेंग्यूच्या प्रतिजन चाचण्या वापरणे.
- रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेटची संख्या कमी होणे.
- लक्षणे दिसू लागल्यानंतर सुमारे पाच दिवसांनी संसर्ग शोधण्यासाठी न्यूक्लिक अॅसिड शोध चाचणी करणे.
- एलिसा चाचणी करून डेंग्यू विषाणूच्या अँटीबॉडीज शोधणे.
उपचार
डेंग्यू या आजरावर उपचार करण्यासाठी कोणतीही विशिष्ट थेरपी किंवा लस उपलब्ध नाही. संसर्ग झाल्यास त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी लक्षणांवर उपचार करणे हा एकमेव माहित असलेला मार्ग आहे. यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पॅरासिटामॉल, भूक वाढवणारे औषध देणे आणि यकृताच्या संरक्षणासाठी औषधोपचार यांचा समावेश होतो – आणि या पद्धतींमध्ये प्रामुख्याने संसर्गाचे दिवस कमी करण्यावर भर दिला जातो.
काय करावे आणि करू नये
- आठवड्यातून किमान एकदा टाक्या आणि इतर कंटेनरमध्ये साचलेले पाणी काढून टाकणे.
- झोपताना मच्छरदाणी आणि जाळी वापरणे.
- डासांच्या चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हात आणि पाय झाकले जातील असे कपडे घालणे.
- प्रसार/प्रजनन या हंगामात डास मारण्यासाठी फवारणी करणे.
- आजूबाजूला किंवा बागेच्या भागात कीटकनाशके आणि फॉगिंग एजंट्स फवारणे.